Tuesday, March 29, 2022

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सहसचिवपदी कोकाटे यांची निवड

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सहसचिवपदी कोकाटे यांची निवड


चिचोंडी पाटील(प्रतिनिधी):-


नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील श्री. दत्तात्रय दशरथ कोकाटे (जी.डी.एस.पॅकर) यांची अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सहसचिवपदी नुकतीच निवड झाली,


त्याबद्दल चिचोंडी पाटील येथील पोस्ट ऑफिसमध्ये मा.एस.पी.एम. साहेब सुनील भागवत साहेब यांनी दत्तात्रय कोकाटे यांचे अभिनंदन केले.


संघटनेच्या कामामध्ये जातीने लक्ष देऊन डाक सेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. डाक संघटनेचे कोणाचे काम, समस्या,अडचणी 

असेल तर ते लवकरात लवकर सोडवल्या जातील असे दत्तात्रय कोकाटे यावेळी म्हणाले.श्री.सुनील भागवत पोस्टमास्टर चिचोंडी पाटील, श्री. बाळासाहेब लांडगे,संजय परभने,सुनील शिंदे, गणेश साठे,सोमनाथ भोईटे,


बंडू गायकवाड,मनीषा सावंत,भारती श्रीखंडे,अंबादास वाडेकर, भाजपा किसान मोर्चा अहमदनगर तालुकाअध्यक्ष बबनराव उर्फ सिताराम शेळके, 


ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,धोंडीराम आगलावे,पत्रकार सोहेल मनियार इत्यादींनी दत्तात्रय कोकाटे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चिचोंडी पाटील मधील अनेक अधिकारी पदाधिकारी,ग्रामस्थ, डाक कर्मचारी यांनी भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सहसचिवपदी दत्तात्रय कोकाटे यांची निवड झाल्याने अभिनंदन केले आहे.



उद्धवराव कांबळे सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित


सहकार भूषण पुरस्काराने उद्धव कांबळे यांना सन्मानित करताना मान्यवर...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील(प्रतिनिधी):-

नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सहकार भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.


कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक उद्धवराव कांबळे यांनी शेतकरी वर्गाचे अनेक प्रश्न सोडवले. सामाजिक कार्यात उद्धवराव कांबळे नेहमीच अग्रेसर असतात.

त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे करण्यात आला. गेली पंचवीस वर्षे उद्धवराव कांबळे सहकार क्षेत्रात सचिव पदापासून कार्यरत आहेत.

कार्यक्रम प्रसंगी दशमी गव्हाणचे सरपंच संगीता उद्धवराव कांबळे, सोसायटी चेअरमन बालासाहेब काळे, 

व्हा.चेअरमन गंगाधर काळे, पोलिस पाटील जयसिंग काळे, संचालक लक्ष्मण शिंदे, संपत काळे, शुभम कांबळे आदी उपस्थित होते.






Wednesday, March 16, 2022

मुख्याध्यापक संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी महादेव चोभे यांची निवड



अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा बैठक संपन्न


अहमदनगर(प्रतिनिधी) :-


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत मुख्याध्यापक संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी शाळा मांडवगण ता.श्रीगोंदा येथील मुख्याध्यापक महादेव चोभे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संघाचे  राज्य संघटक राजेंद्र निमसे व संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळसाहेब कदम यांनी केली .


अहमदनगर जिमखाना एमआयडीसी  येथे राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अहमदनगर जिल्हा संघ व ऐक्य मंडळाची बैठक संपन्न झाली.जिल्हा संघाच्या बैठकीत प्रामुख्याने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या आवाहनानुसार जूनी पेन्शन योजना यांचे सह अन्य प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या धरणे आंदोलन बाबत आढावा घेण्यात आला.


 जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे उशिरा होणारे वेतन, रखडलेली वरिष्ठ व निवड श्रेणी यांच्यासह अन्य प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा होऊन या प्रश्नांबाबत संघाने पाठपुरावा सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली . तसेच येत्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये ऐक्य मंडळाच्या भूमिकेविषयी सखोल चर्चा झाली . 


लवकर ऐक्य मंडळाची जिल्हा सुकाणू समिती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ऐक्य मंडळाचे जिल्हासरचिटणीस सुरेश नवले यांनी दिली .जिल्हा संघाच्या या बैठकीस राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्यसंघटक राजेंद्र निमसे, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, संघाचे जिल्हा


उपाध्यक्ष सुधीर रणदिवे ,विलास लवांडे ,मधुकर डहाळे, जिल्हाचिटणीस प्रदिप चक्रनारायण , जिल्हा संघटक लाजरस कसोटे ,माजी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण चेमटे,अखिल पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके, जिल्हा सरचिटणीस संगीता


घोडके, प्राथ.शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, सुखदेव डेंगळे, शहाजी जरे, महादेव चोभे, पांडुरंग झरेकर , प्रविण शेळके, विनायक गोरे,विश्‍वनाथ कदम , रवींद्र दरेकर , सुनील पठारे , लहू फलके , बबन जऱ्हाड, संतोष ठाणगे ,नितीन गायकवाड , संजय वाघुले आदी उपस्थित होते.



नगर तालुका पोलीसांचा अभिनव उपक्रम.. १०५ बेवारस वाहन मालकांचा लावला शोध.



नगर तालुका पोलीसांचा अभिनव उपक्रम.. १०५ बेवारस वाहन मालकांचा लावला शोध.

अहमदनगर(प्रतिनिधी):-

तालुका पोलीस स्टेशन परिसरात वाहनांचे मालक मिळून येत नसल्यामुळे अनेक वाहने वर्षानुवर्षे मूळ मालकांच्या प्रतिक्षेत पोलीस स्टेशनच्या आवारात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर बकाल दिसून येतो. त्यामुळे पोलीस ठाणे. सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशनने या बेवारस वाहनांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला.


नगर तालुका पोलीस स्टेशन परिसरात बेवारस तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने यांचे मूळ मालकाचा शोध घेऊन ती वाहने मूळ मालकास परत देण्याचा आदेश पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्या अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशन आवारातील अनेक वर्ष धूळ खात पडलेल्या वाहनांच्या चेसीज व इंजिन नंबर वरून २ दिवसांत एकूण १०५ वाहन मालकांचा शोध मावळ तालुक्यातील परंदवाडी जिल्हा पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने शोध लावला.


शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन वाहने परत घेऊन जाण्याबाबत आवाहन पोलीसांनी केले आहे. नगर तालुका पोलीस स्टेशन, भिंगार अहमदनगर आवारात बरीच वाहने धूळखात पडून आहेत. त्यापैकी १०५ वाहन मालकांचा शोध लागला, बाकी वाहन मालकांचा शोध लावण्यासाठी तपास चालू आहे.


तरी वाहन मालकांकरीता वाहन क्रमांक, चेसीज नंबर, वाहनाचा प्रकार, इंजिन नंबर, वाहन मालकाचे नाव, पत्ता यादी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली आहे. मालकांनी ओळख पटवून आपले वाहन घेऊन जावे असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.


गंगामाता वाहन शोध संस्थेच्या वतीने सदर १०५ वाहन मालकांना संपर्क केला जाणार आहे. व सदर वाहन मालकांनी तात्काळ नगर तालुका पोलीस स्टेशन, भिंगार,अहमदनगर येथून वाहनाची कागदपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र दाखवून घेऊन जावीत.


नसतील तर ते वाहन बेवारस समजून सरकारी प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येणार आहेत. असे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र नप यांनी सांगितले.अप्पर पोलीस अधिक्षक सौरव कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशन आवारात


मालकांच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासून बेवारस, अपघात तसेच विविध गुन्ह्यांत जप्त असलेल्या १०५ वाहन मालकांचा शोध घेण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, मुद्देमाल कारकून पोलीस अंमलदार जे. बी. बांगर, होमगार्ड शुभम म्हस्के व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ, गोरख नवसुपे, संजय काळे यांना यश आले आहे.



Tuesday, March 15, 2022

काय! मुलगी नसणाऱ्या जोडप्याकडून गायीच्या वासराचे बारसं, घातलं गाव जेवण!!


एका दिव्यांग बेवारस गाईचे भरण पोषण करून तिच्या वासराचा नामकरण सोहळा करत गाव जेवण नांदेडच्या शेतकरी जोडप्याने घातले आहे.

लोकमन(प्रतिनिधी):-

प्राणीमात्रांवर प्रेम करणं म्हणजे पुण्याचं काम म्हटलं जात, त्यात आपल्या लाडक्या जनावरांवरील प्रेमापोटी लोक काय करतील आणि काय नाय? याचाही नेम नाही.


नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे. या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवल्याचंही समोर आलं आहे. देगलूर तालुक्यातील खानापूर येथील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या गायीवरील प्रेमापोटी असा आगळा-वेगळा सोहळा ठेवला आहे.


खानापूर येथील पशुपालक शेतकरी मारोती मारजवाडे यांना लॉकडाऊन काळात रस्त्याच्या कडेला बेवारस तडफडत पडलेले दिव्यांग गायीचे वासरु आजपासून दोन वर्षापूर्वी सापडले होते. हे वासरु पाय मोडलेल्या अवस्थेत विव्हळत रस्त्याच्या कडेला पडले होते. दरम्यान पशु प्रेमी असणाऱ्या मारोती मारजवाडे यांनी या वासराला पाहताच त्याला घरी आणून त्याच्यावर उपचार केले.


योग्य औषध उपचार करून या गायीच्या पिलाचे त्यांनी पालन पोषण केले. तसंच त्यांना एक मुलगाच असल्याने त्यांना आणि पत्नी आरतीबाई मारजवाडे यांना मुलगी नसल्याची खंत होती. 


त्यामुळे मारजेवाड जोडप्याने या वासराचे पोटच्या लेकीप्रमाणे पालन पोषण केले. हळूहळू या गायीचा संपूर्ण मारजवाडे कुटुंबाला लळा लागला. मारजवाडे कुटुंबीयांनी या गायीचे नाव सोनी असे ठेवले. त्यानंतर आता या गायीला वासरु झाले असून त्याचा आज नामकरण सोहळा ठेवण्यात आला होता. 


दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या नावावरून या वासराचे नाव बसवान्ना ठेवण्यात आले आहे. दरम्यान दोन वर्षे आपल्या मुलाप्रमाणे संभाळलेली सोनी गाय कधीकाळी दिव्यांग होती असे आता वाटत नाही. 

आज दोन वर्षांनंतर ह्या गायीने वासरास जन्म दिला आहे. त्यामुळे आनंदून गेलेल्या मारजेवाड कुटुंबाने वासराचे बारसे घालत गाव जेवण देखील ठेवले आहे.



होलिकेच्या अग्नीत 'या' गोष्टी टाकल्याने आरोग्य सुदृढ राहतं



होलिकेच्या अग्नीत 'या' गोष्टी टाकल्याने आरोग्य सुदृढ राहतं जाणून घेऊया सविस्तर माहिती...


लोकमन(प्रतिनिधी):-

होलिका दहनाचा अग्नि अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानला जातो. होलिका दहनाच्या संदर्भात असे मानले जाते की, आपण होळीच्या अग्नीत आपले दुष्कृत्य जाळत असतो आणि जुन्या वर्षातील सर्व दुष्कृत्यांचा नाश करतो. होलिकेच्या अग्नीसंदर्भात काही उपाय सामान्य लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे रोग दूर होतात आणि आरोग्य सुदृढ राहतं.


होलिकेच्या अग्नीत काळे तीळ टाका:-


असे म्हटले जाते की, होलिका दहनाच्या वेळी काही उपाय करणे उत्तम आरोग्याच्या दृष्टीने खूप खास असते. होलिकेच्या अग्नीत काळे तीळ टाकल्याने आरोग्य चांगले राहते.


उजव्या हातात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या डोक्यावरून किंवा घरात आजारी असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरूव ३ वेळा फिरवून होलिकेच्या अग्नीत टाकावे. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.


वेलची आणि कापूरचा उपाय:-


होळीच्या आगीत सौभाग्याच्या वस्तू टाकल्याने निरोगी आरोग्याच्या इच्छा पूर्ण होतात. होलिका दहन करताना त्यात ११ वेलची आणि कापूर टाका. असे केल्यावर होलिकेकडे मागे वळून पाहू नका आणि घरी जा. 


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन त्याच होळीची राख घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर लावावी. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व लोक आजारांपासून दूर राहतात.


चंदनाचा उपाय:-


जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर होलिका दहनाच्या दिवशी चंदनाचा हा उपाय तुम्हाला धनवान बनवू शकतो. धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी होलिका दहनात चंदन टाका.


जळत्या होळीमध्ये किमान दीड किलो चंदनाचे लाकूड दोन्ही हातांनी टाकून नमस्कार करावा. असे केल्याने हळूहळू तुमच्या घरातून आर्थिक समस्या नाहीशी होईल.


नोकरीमध्ये यश मिळविण्यासाठी:-


अनेक प्रयत्नांनंतरही तुम्हाला नोकरीत यश मिळत नसेल किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्यासाठी मूठभर पिवळी मोहरी घ्या. डोक्यावरून ५ वेळा फिरवून होळीच्या पवित्र अग्नीत टाका.असे करणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.


लग्नात विलंब होत असेल तर:-

जर तुमच्या घरातील कोणाच्या लग्नात विलंब होत असेल किंवा वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर होळीशी संबंधित हा उपाय तुम्हाला शुभ फळ देईल. हवन सामग्रीच्या साहित्यात तूप मिसळा आणि स्वतःच्या हाताने होलिकेच्या अग्नीत टाका. असे केल्याने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.