Tuesday, July 26, 2022

भारतीय सैनिकाच्या जीवनातील प्रसंगाने पुन्हा जिवंत झाल्या कारगिलच्या आठवणी

   

कारगिल विजय दिवसा निमित्त एका सैनिकाच्या जीवनातील प्रसंग व आठवणी.कारगिल युद्धात प्रतिकूल परिस्थितीत शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्याची आठवण कारगिल विजय दिवस रूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. सैन्यदलाप्रति कृतज्ञ भावना उजागर करणाऱ्या कारगिल विजय दिवसानिमित्त एका भारतीय सैनिकाच्या जीवनातील प्रसंगावर,आठवणीवर स्पेशल रिपोर्ट

पत्रकार सोहेल मनियार (अहमदनगर वार्ताहर)

 कारगिल विजयी दिवसा  निमित्त चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर येथील भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक लक्ष्मण गोपीनाथ हजारे यांनी कारगिल युद्धाच्या सांगितल्या आठवणी आणि जीवनातील प्रसंग त्यांच्याच शब्दात.

      कारगिल युद्धात बहादुर शुर पराक्रमी साहसी व भारत मातेच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या आमच्या भावांना भावपूर्ण श्रध्दांजली.

सर्व आजी माजी सैनिकांना कारगिल विजयी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 


 कारगिल च्या युद्दात प्रत्यक्ष रणभुमी वर दोन - तीन महीने पाकिस्तानी बॉर्डर वर आमच्या वायुदलाच्या रडार यंत्रणे बरोबर डयुटीचा योग आला. सदरच्या वेळेत आलेले काही रोमांचक अनुभव. कारगिल ची प्रत्यक्ष सुरवात होण्यापुर्वी मी माझ्या चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर गांवी सुटटीवर आलेलो होतो. साधारण पणे मे च्या शेवटच्या आठवडयात धोंडयाचा महीना असल्याने मी सुटटीवर आलेलो होतो. मी सुट्टीवर आलो तोच माझ्या आईसाठी दिवाळी - दसरा असायचा. मी सुट्टीवर आलो की माझ्या आईला खूप आनंद व्हायचा. आईने घरी धोंड्याचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. 


त्यावेळी आमच्या घरी आमचे जवळचे नातेवाईक मंडळी  धोंडयाच्या जेवणासाठी आलेले होते. त्याकाळात फोन सुविधा फारच कमी होत्या. साधारण दुपारी दोन च्या सुमारास पोष्टमन मला शोधत घरी आला व तार देवुन गेला. तारे चा मजकुर होता Leave cancelled. Come soon.(रजा रद्द, कर्तव्यावर लवकर या). तोपर्यंत आमचे जेवण उरकली नव्हती. तार आलेले माहीत झाल्यावर घरातील मंडळी व नातेवाईक थोडेसे अस्वस्थ झाले. जसे - तसे जेवणं झाली. साधारण दोन - तीन दिवसानंतर माझे पुणे - जम्मुतावी झेलम एक्सप्रेसचे रेल्वेचे रिझर्वेशन होते. परंतु अर्जंट ड्युटी वर हजर होण्याचा आदेश आल्याने मी लगेच संध्याकाळी चिचोंडी पाटील वरून साधारणपणे सहा च्या दरम्यान बसने निघालो. सोबत माझी पत्नी शैलजा व १ वर्षाचा मुलगा विशाल देखील होता. मी पत्नीला म्हटल तु आता येथेच थांब पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आमचे एअर फोर्स स्टेशन त्यावेळी peace स्टेशन असल्याने व अगोदर पासुन मी फॅमिली सह सदर ठिकाणी राहत असल्याने पत्नी अगोदर पण सहा महिने बरोबर राहीलेली असल्याने तिने बरोबर येण्याचा निर्णय घेतला. 


त्यावेळी माझ्या आई वडीलांनी, सासु - सासऱ्यांनी व विशेष करून माझ्या प्रिय आजीने तीला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण तिचा निर्णय पक्का होता व तिने  मला यायचच आहे अस ठणकाऊन सांगितल्याने माझा नाविलाज झाला व मी लगेच पत्नी व एक वर्षाच्या मुलासह संध्याकाळ च्या झेलम एक्सप्रेसने डयुटीला निघालो. झेलम एकसप्रेस मध्ये अहमदनगरहुन सैन्यासाठी (मिल्ट्रीचा) स्पेशल रेल्वेचाडबा असल्याने व इतर आमच्या जवान मंडळीने फॅमिलीसाठी जागा उपलब्ध करून दिली. असा - तसा ३३ तासाचा रेल्वेचा प्रवास संपला व मी माझ्या एअर फोर्स स्टेशन मध्ये सकाळी पोहचलो. मुलाला व पत्नीला कॉर्टरला सोडून युनिटला पोहचलो तर लगेच समजले की युनिट पाकीस्तानी बॉर्डर वर गेलेले असुन दुपारी एक भारतीय सैन्याची गाडी लोकेशनला जाणार आहे. त्यापधतीने मी माझ्या सामानाची आवरा - आवर केली व आमच्या युनिट च्या गाडीत दुपारी बॉर्डरला निघालो . संध्याकाळी आठ नऊ वाजता साईट वर पोहोचलो. बॉर्डरला जातानाचे रस्त्याचे दृश्य अतिशय विदारक होते. त्याला कारण ही तसेच होते. 


आम्ही बॉर्डर कडे आमच्या युनिट च्या गाडीत चाललो होतो व समोरुन बॉर्डर कडुन तेथील रहीवासी त्यांच्या गुरा - डोरासह आमच्या कडे बैल गाड्या , ट्रॅक्टर , ट्रक ने येत होते. तो प्रसंग पाहुन मन अगदी भरुन येत होते. साईट वर पोहचल्या वर मला टेंट मध्ये युनिट प्लॅन प्रमाणे जागा मिळाली. त्यादिवशीची रात्र अशीच गेली. सकाळी - सकाळी च आम्हाला आदेश मिळाला कि रडार अजुन पुढे बॉर्डरला हलवायचे आहे. त्या पध्तीने आमच्या ॲडव्हान्स टिम ने सर्व्हे केला व बाकी सर्वांनी युनिट ची पॅकींग चालु केली. डोंबार्‍याच्या खेळा प्रमाणे आम्ही सर्व जण आमचे सामान पॅक करत होतो. सहा तासा नंतर आम्ही सर्व पॅकींग करून नवीन लोकेशनला निघालो. ॲडव्हान्स टिम पुढे गेली होती. त्यांनी पुढे जावुन मेस व . सर्वांसाठी टेंट चे नियोजन केले होते. दिवस भर उन्हाचा भरपुर उकाडा होता. साधारण पणे चार वाजता आम्ही सर्व युनिट सह नवीन लोकेशनला पोहचलो. पोहचल्या - पोहचल्या जोराचा पाउस सुरू झाला. सर्व जण कसेबसे वाचले. थोडया वेळाने पाऊस थांबला. सर्वजण आपल्या - आपल्या नियोजीत जागेत स्थिर - स्थावर झाले. टेन्ट (तंबू) मधील मेस मध्ये संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालु होती . वरण, भात,भाजी मोठ -मोठ्या पातेल्यात शिजत होती. चपत्या तयार होत होत्या .


साधारणपणे संध्या काळचे सात - आठ वाजले असतील तेंव्हा अचानक वातावरणात सर्वत्र उडणारे घोडे आणि उडणारे किडे आले. सर्व तयार स्वयंपाकात घोडे आणि किडे पडले. सदरची भाजी, वरण व भातात किडेच किडे व घोडेच -घोडे पडलेले दिसत होते. दिवसभर प्रवास करून सर्व जण दमलेले व भुकीने व्याकुळ झालेले होते. अश्या परीस्थितीत मिळेल ते पोटात पडणे महत्वाचे असल्याने आम्ही सर्वांनी आहे तसे वरण - भात, भाजी ताटात घेतले व  दळणातुन खडे निवडावेत तसे ताटातुन कीडे , घोडे निवडुन बाजुला काढून जेवण करत होतो. भुक इतकी प्रचंड लागली होती की काहीतरी पोटात टाकणे हेच महत्वाचे वाटत होते. आमच्यात काही जण शाकाहरी मंडळी पण होती . त्यांना पण नाइलाजास्तव आहे तसे जेवण करावेच लागले. अन्न जगण्यासाठी किती महत्वाचे असते याचा प्रत्यय सदरच्या अनुभवातुन आम्हाला आला . आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. जेवणातुन स्थिर -स्थावर होवुन आप -आपल्या टेंट मध्ये झोपण्या साठी गेलो.


 जे जवान ड्युटी वर होते ते ड्युटी वर गेले. साधारण रात्री च्या बारा - एकच्या दरम्यान जोराचा पाऊस व वारा चालु झाला. आमच्या टेंटमध्ये वाऱ्यामुळे पाऊसा चे पाणी येत होते. सर्व टेंट मध्ये कॉट खाली पाणी साचले होते. तेव्हा अचानक जोरात वारे सुटले व  सर्व टेंट च्या दोऱ्या साईडने मोकळ्या झाल्या . आमच्या टेंटमध्ये आम्ही सहाजण टेंट चा मधला खांब पकडुन उभे होतो . साईड च्या सर्व दोऱ्या सुटल्या होत्या. पाऊस मी म्हणत होता. पाऊसाने नको नको केले होते. आम्ही सर्वजण साधारण एक फुट पाण्यात उभे राहुन टेंटच्या खांबाला पकडुन उभे होतो. टेंटचे सर्व कापड सर्व बाजुने आमच्या अंगावर आले होते. गार वारे सुटले होते. थंडी पण वाजत होती. आमचे सर्वांचे सर्व सामान,कपडे पाऊसाने भिजले होते. आमचे उददीष्ट फक्त ऐवढेच होते की कोणत्याही परीस्थितीत पावसापासून स्वतः चे संरक्षण करायचे. आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारे येतात. एक - दोन तासा नंतर पाऊस बंद झाला व आम्ही सर्वजण टेंटचा खांब अलगद बाजुला ठेऊन बाहेर आलो. तोपर्यंत सकाळचे चार - पाच वाजले होते. नंतर आम्ही सकाळची वाट पाहु लगलो . सकाळ झाल्यावर साधारणपणे आठ वाजता कडक उन्ह पडले व आम्ही सर्व जणांनी आप-आपले कपडे सुकवायला टाकले. तो दिवस असाच गेला. दुपारनंतर  आम्ही आमच्या युनिट ची सेटअप करण्यात गुंतलो. दहा तासानंतर आमचे युनिट पूर्ण क्षमतेने चालु झाले. पुढे कारगिल च्या मुख्य फेजमध्ये आम्ही सर्वजण इतके बिझी झालो की आमचे रडार जास्तीत - जास्त वेळ चालुच असायचे. सदरचा दोन महीन्याचा कालावधी कसा गेला ते समजलेच नाही. हया कालावधीत माझी पत्नी व मुलगा माझ्या पोस्टींग असलेल्या एअरफोर्स स्टेशन च्या कॉर्टर मध्येच राहत होते. कारगिल मध्ये मी सहभागी होतो याचा मला सार्थ अभिमान आहे.

 मेजर लक्ष्मण गोपीनाथ हजारे या सैनिकाच्या कार्याला सलाम...

   पत्रकार सोहेल मनियार





Monday, July 25, 2022

'आजचं राजकारण म्हणजे शंभर टक्के सत्ताकारण'- नितीन गडकरी

लोकमन महाराष्ट्र न्यूज


मुंबई (प्रतिनिधी) : 

आज राजकारण म्हणजे शंभर टक्के सत्ताकारण झाल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते नागपूरमधील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.


यावेळी गडकरी म्हणाले की, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे आपण समजून घ्यायला पाहिजे.


महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. आता मात्र शंभर टक्के सत्ताकारण झालं आहे, असेदेखील नितीन गडकरी म्हणाले.


गडकरी पुढे म्हणाले की, मला अनेकदा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारखा आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.


राजकारणात गुणात्मक परिवर्तन एक प्रक्रिया आहे. थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.



Sunday, July 24, 2022

गुंडेगाव येथे घाणीचे साम्राज्य; साफ-सफाई करण्याची मागणी.. ;नागरिकांचे आरोग्य धोक्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो कचरा, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज

गुंडेगाव (प्रतिनिधी)


गुंडेगाव ता.नगर येथील ग्रामपंचायत गावठाण हद्दीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून गाव परिसरात प्लॅस्टिक,कागदे, सडलेले पालेभाज्या तसेच अनेक झाडं झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे


तसेच गुंडेगाव येथून जवळ असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसराच्या चहुबाजूंनी घाण कचरा,मावा, तंबाखूचे जन्य कचरा पसरल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच सध्या पावसामुळे हा कचरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नसल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नाही किंवा त्याबाबत कुठल्याच उपाय योजना आखल्या जात नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे.

 
गुंडेगाव हे गाव सध्या समस्याने वेढलेले आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता गृह,कचरा कुंडी, आरोग्य विभागाचे कुठलेच नियोजन नसणे,विद्युत पुरवठा सुरळीत नसणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

  सध्या पावसाळ्यात काही नागरी रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण होताना दिसत आहे. तसेच संपूर्ण गावातील या समस्यांवर उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे सर्वच स्तरातून तक्रारी होताना पहावयास मिळत आहे.अनेक वेळा प्रशासनाला सांगण्यात आले असुन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याची पाहून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.

  

 

ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला रविवारी आठवडे बाजार भरतो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बाजूला सुद्धा घाणीचे ढीग तयार झाले आहेत.याकडे ग्रामपंचायत सफाई कामगार असुन नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे.अशावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष न देता हम करे सो कायदा अशीच भूमिका घेतली आहे.साथीच्या  परिस्थिती मध्ये तरी परिसराची  स्वच्छता होणे अपेक्षित असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर यासारखं जनतेचे दुर्दैव नाही.  


   गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्त्यावर देखील घाण पसरलेली पाहावयास मिळत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने चिखलमय रस्ता झाला आहे‌. त्यामुळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांना, वाहनचालक, वयोवृद्ध महिला नागरिक यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होताना दिसत आहे.बस स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही.त्यामुळे प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शौचालय बांधले गेले नसल्याने नागरिक उघड्यावर शौचाला जात आहेत. त्यामुळे हागणदारी फलक निव्वळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी,यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत..


चौकट....

"गुंडेगाव परिसरात स्वच्छता,पाणी, विद्युत पुरवठा,आरोग्य, रस्ते अशा  अनेक समस्यांना सध्या नागरिक त्रासले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे या विषयी मोहीम राबवली जात नाही. रस्ता, अतिक्रमण,घाणी संदर्भात अनेक वेळा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत कुठलीच कारवाई होत नसल्याने शेवटी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे."

दादासाहेब आगळे - सामाजिक कार्यकर्ते,गुंडेगाव



शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : अनंत गिते

 


मुंबई (प्रतिनिधी) 

मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मोठे विधान केले. 


यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेने या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत, मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार असल्याची कल्पना दिली आहे.


शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तसेच आता उभा महाराष्ट्र शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारल्या शिवाय राहणार नाही, शिवसेनेनं फक्त आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी अनंत गीते यांनी केली.


शिवसेना कोणाची? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा कोणताही वर्ग करता येणार नाही, यावर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल? तर एखाद्याला गद्दार शब्द लागत असेल तर त्यांनी आपण शिवसैनिक आहोत का? हे सांगावे.


शिंदे गटाची दखल कोणीही घेण्याची गरज नाही. गद्दारी माझ्या रक्तात नाही, तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवाराचा उदय होणार आहे, तसेच कोर्टाच्या निकालानंतर शिंदे सरकार कोसळेल, असं वक्तव्य अनंत गिते यांनी केले. याबरोबरच रायगडमधील तीन, रत्नागिरीतील दोघांना धूळ चारण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन गीते यांनी केले.



सुरत चेन्नई महामार्ग संदर्भात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मेळावा.

 

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही समृद्धी महामार्गा प्रमाणे मोबदला द्यावा.

अन्यथा मोठे आंदोलन उभा करू राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार


चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

नगर तालुक्यातून जात असणाऱ्या सुरत चेन्नई महामार्ग संदर्भात आज चिचोंडी पाटील समाधान मंगल कार्यालय सांडवा फाटा येथे हा मेळावा पार पडला.


  यावेळी चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण,भातोडी,मदडगाव, कोल्हेवाडी,सारोळा,शहापूर, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव तसेच आष्टी तालुक्यांतील अनेक गावे व बार्शी, परंडा या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना लोकनेते घनश्याम आण्णा शेलार यांनी सांगितले की देशात सर्वाधिक मोबदला दिलेल्या समृद्धी महामार्गाचा दर या भागातील शेतकऱ्यांना मिळून देणारच , नुकसान भरपाईचे दर जाहीर केल्याशिवाय अधिग्रहण प्रक्रिया पार पाडू नये अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन करू असा इशारा दिला.

   


    
शेतकऱ्यांच्या 7/12 वरील नोंदी. महामार्ग लगत सर्विस रोड. जमिनीच्या मधून हा महामार्ग आडवा तीडवा जात असल्याने जमिनीचे त्रिकोणी षटकोनी तुकडे होत असून त्यामुळे जमिनी नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

त्याचबरोबर मुख्य रस्त्यापासून  शिवार वाटा,गाडीवाटा बंद होणार असून त्यामुळे जमिनी पडीक पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. काही शेतकरी यामध्ये भूमीहिन होत आहेत,


काही शेतकऱ्यांची यामध्ये घरे, गोठे,विहिरी,शेततलाव,भुसारे, शेड,कोंबडी फार्म जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी घाबरून गेलेले आहेत. या सर्व शेती उपयोगी साधनांची 7/12 वर नोंद घेण्यात यावी.


काही शेतकऱ्यांच्या विहिरी, शेत तलाव, बोरवेल्स जात असून विहिरीवर अवलंबून असणाऱ्या बागायती जमिनी त्यामुळे पडीक पडणार आहेत. त्यामुळे मूल्यांकन करत असताना या उर्वरित पडीक होणाऱ्या जमिनींचे ही मूल्यांकन करावे व याबाबत शासन निर्णयात आत्ताच निर्णय घेऊन नुकसान भरपाई द्यावी. 

     यावेळी शरदभाऊ पवार, प्रकाशजी पोटे,प्रवीण कोकाटे, आबासाहेब कोकाटे सर,डॉक्टर ससे, शरद गुंजाळ,मच्छिंद्र खडके, प्रल्हादशेठ खांदवे,साहेबराव शेडाळे, प्रभाकर आगरकर, भास्कर खडके,जयसिंग काळे, वैभव कोकाटे,दादासाहेब पवार,संतोष कोकाटे,संतोष खराडे,राजेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास

महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करू असा इशारा दिला.                 

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आम्हाला कुठलीही नोटीस पूर्वसूचना न देता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे समस्यांचा पाढाच या महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमोर मांडला.

यावेळी भूमिपुत्र कृती समिती स्थापन करण्यात आली. 

ज्यांनी हा मेळावा घडवून आणला असे युवानेते शरदभाऊ पवार यांची शेतकरी भूमिपुत्र कृती समितीचे निमंत्रक पदी सर्वांच्या वतीने निवड करण्यात आली.

            महामार्ग गेलेल्या प्रत्येक गावात भूमिपुत्र कृती समितीचे 5 ऍक्टिव्ह सदस्य राहणार असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पुढील आंदोलनाविषयी माहिती देण्यात येईल.व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.


सातबारा वरील नोंदी व इतर हक्कातील नोंदी, शेतकऱ्यांनी कर्ज काढल्यामुळे व पतसंस्था बँक व खाजगी सावकारांच्या नावे सातबारा झाल्यामुळे या संदर्भात येत्या मंगळवारी महसूल अधिकारी व तहसीलदारांना कृती समिती भेटणार.

 यावेळी परिसरातील सर्व शेतकरी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Friday, July 15, 2022

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करू - खासदार सदाशिव लोखंडे

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


सुरत चेन्नई ग्रीनफील्ड  महामार्गाच्या केंद्रीय दिशादर्शक समितीचे चेअरमन खासदार सदाशिवराव लोखंडे यांना निवेदन दिले.


         
 ग्रीनफील्ड महामार्ग जात असणाऱ्या व नव्याने सर्वे केलेल्या नगर  चिचोंडी पाटील,दशमी गव्हाण भातोडी,मदडगाव,कोल्हेवाडी, सारोळा,शहापूर येथील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत,


यामध्ये शेतकऱ्यांचे बागायती जमीनी,घरे,गोठे, भुसारे,पाईपलाईन,विहीरी,शेत तलाव, फळबाग,पोल्ट्रीफार्म, शेड, यासारखी शेती उपयोगी साधनांचे मोठे नुकसान होत असून व या साधनसामुग्रीची सातबारा तलाठी रेकॉर्डला नोंद करून घेण्यात यावी.


नगर जामखेड  नगर पाथर्डी हायवे लगतच्या जमिनी बाबत संबंधित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक लावून जमिनीचे व सर्व नुकसान होणाऱ्या साधनसामग्रीचे भरपाई चे दर जाहीर करावे.


 शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सुरू करावी,ही मागणी नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरदभाऊ पवार,नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रोहिदास पाटील कर्डिले, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रकाशजी पोटे, व शेतकरी यांनी खासदार लोखंडे साहेब यांच्याकडे केली,


ग्रीनफिल्ड महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक लावू असे आश्वासन लोखंडे साहेब यांनी दिले,


Monday, July 11, 2022

चिमुकल्यांच्या पर्यावरण दिंडीने परिसर दुमदुमला, कुताळमळा शाळेचा आनोखा पालखी सोहळा....

 


गुंडेगाव प्रतिनिधी :-

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे नुकतेच जिल्हा  प्राथमिक शाळा कुताळमळा ( गुंडेगाव) यांच्या वतीने पर्यावरण पुरक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्याच्या मुखातून गोड वाणी मधुन  विठ्ठल..विठ्ठल... विठ्ठला... हरि ओम विठ्ठला..., विठ्ठल नामाची शाळा भरली... माऊली.. माऊली.. अशा विठ्ठलनामाने चिमुकल्यांनी कुताळमळा  परिसरातून दिंडी सोहळा  दुमदुमून सोडला. 


या दिंडीत बालवारकरी हातात भगव्या पतका, टाळ, मृदूंग, विणा घेऊन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी... या गाण्यातून वृक्षारोपण व वृक्षसंवधानाच्या घोषणादेऊन वृक्षलागवडीचे महत्व परिसारातील नागरिकांना पटवून देत होते. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव येथील सर्वच  शाळांमध्ये  बालवारकर्‍यांनी दिंडी काढली. पर्यावरण पुरक दिंडी चे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा येथील मुख्याध्यापिका आशा गिरवले, शिक्षिका दिपस्वी शितोळे- पवार यांनी दिंडी चे आयोजन केले होते. 


आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी व चिमुकल्या  दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले  होते पहिली पासून चौथी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व विद्यार्थ्यांसमवेत भंजनी मंडळ, महिला, ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. विठ्ठल-विठ्ठल, हरीनामाचा गजर, विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन  झाडे लावा पर्यावरण वाचवा संदेश  देत शाळेपासुन माळवाडी हनुमान मंदिर येथे प्रदक्षिणा घालत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते,


हलक्या पावसाच्या सरीत लहान थोरापर्यंत मुखातून हरीनामाचा गजर दुमदुमला, या पर्यावरण दिंडी सोहोळ्यासाठी वारकरी संप्रदायाचे गुंडेगाव ते श्रीधर स्वामी, सुरेगाव पायी दिंडीचे आयोजक उत्तम रामराव भापकर यांनी  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 


या दिंडी सोहळ्यात जेष्ठ मार्गदर्शक विठ्ठल कुताळ, सिताराम कुताळ, सुनील कुताळ महाराज, काशिनाथ कुताळ   ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुताळ, युवा नेते सतिश काका चौधरी, गुंडेगाव वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक सचिन कुताळ, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राजेंद्र पिंपरकर,पत्रकार संजय भापकर, शहाजी कुताळ, विजय कुताळ, सागर कुताळ, अक्षय कुताळ, संतोष कोतकर, शरद कुताळ, वैशाली कुताळ, शितल कुताळ, साक्षी कुताळ,  कोमल महिंद्र कुताळ, शारदा पिंपरकर , दिपाली कुताळ, अर्चना कुताळ,  जयश्री कुताळ, रेखा कुताळ , कोमल भापकर, क्रांती कुताळ  आशा सेविका कविता कुताळ, मनिषा कुताळ, प्रिती भापकर अदि ग्रांमस्थ उपस्थितीत होते.