Saturday, January 29, 2022

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांवर 'असा राहणार वॉच'

 


पुणे(प्रतिनिधी):- 


ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा गैरफायदा घेऊन कॉपी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 'वॉच' ठेवला जाणार आहे. यंदा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून, यात विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


विद्यापीठाची यंदाची सत्र परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून होणार आहेत.


या परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने, त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या (एमसीक्यू) असणार आहेत. या परीक्षांमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 'प्रॉक्टर्ड' पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे.
आता त्यात आणखी काही कडक नियम लागू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ते स्क्रीन सोडून बाहेर जात असतील, तर त्यांना परीक्षेतून बाद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


परीक्षा अधिक पारदर्शी पद्धतीने व्हाव्यात, यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.


विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षांबाबतीत अधिक सतर्कता बाळगण्यात येणार असल्याने यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कसून तयारी करावीच लागणार आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आता परीक्षा विभागाला आहे. त्यामुळे विद्यार्थी कशाप्रकारे गैरप्रकार करू शकतात, याबाबत सर्व माहिती विभागाकडे आहे. नेमक्या त्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार असल्याने कॉपी करणाऱ्यांना यंदा घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.



अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था:-

विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांनी जर ऑनलाइन परीक्षा देण्याची मागणी केली, तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.गेल्या वेळी विद्यापीठाच्या सहा अंध विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही परीक्षा देऊन पाहिली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या वेळेलाही अंध विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली असून,त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑडिओद्वारे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी स्वत:च्या आवाजात उत्तरांचे पर्यात देतात आणि ते उत्तर रेकॉर्ड केले जाते.


परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाला आता ऑनलाइन परीक्षांचा अनुभव आला आहे. यामुळे यंदाच्या परीक्षांमध्ये फारशा अडचणी येणार नाहीत. यंदा विद्यार्थ्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्याची पडताळणी करून, दोषी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल. परीक्षा अत्यंत पारदर्शी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.


ऑनलाइन परीक्षांमध्ये यापूर्वी झालेली कारवाई:-

१.जवळपास १८०० विद्यार्थी कॉपी करताना सापडले. 

२. ६० टक्के म्हणजेच १२००पेक्षा अधिक विद्यार्थी इंजिनीअरिंगचे होते.


३.६०० विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन - शाखेतील.

४. विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचा दंड.

५. विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक पेपरमध्ये गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संपूर्ण परीक्षा रद्द.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार 

9284856967

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम व ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्याचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्याचे आवाहन प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले.

लोकमन(प्रतिनिधी):- 

“शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे" असे म्हणत नयी तालीमच्या रुपाने देशाला शिक्षणाची देणगी दिली.


महात्मा गांधीजींचा स्मृतीदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या ३H (Heart, Hand, and Head) मन मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा,


यासाठी हुतात्मा दिन, ३० जानेवारी २०२२ ला विविध शैक्षणिक कार्यक्रम आयेजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने  परिपत्रक क्रमांक संकीर्ण- २०२२/प्र.क्र.-४ / एस.डी.-४ या संदर्भिय परिपत्रकान्वये घेतला आहे.


जिल्हयातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शासन परिपत्रकाप्रमाणे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

 

असे परिपत्रक प्राथमिक/माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

Friday, January 28, 2022

पोरांनो लागा तयारीला... राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार


लोकमन(प्रतिनिधी):-


मनुष्यबळ अपुरे असल्याने सरकारने पहिल्या टप्प्यात ५ हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.


तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


गृहमंत्री वळसे यांच्या हस्ते येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ई- टपाल कक्षाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर वळसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.


बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर,आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. पोलिसांना सुविधा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पोलिसांचे वर्तन असले पाहिजे.



सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे कमी कसे होतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पोलिसांना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर जनता दरबार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,असे वळसे म्हणाले.


राज्यात ८७ पोलीस स्टेशनच्या इमारतींना मंजुरीराज्यातील ८७ पोलीस ठाण्यांच्या इमारतींना मंजुरी देण्यात आलेली आहे. 


पोलीस स्टेशनच्या इमारतींबरोबर पोलिसांसाठी नव्याने वसाहती उभारण्याचा सरकारचा मानस आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार



पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

पुणे(प्रतिनिधी):- 


1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालक घेतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.


राज्य सरकारने 23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे सोपवला होता.


 त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून शाळा सुरुही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहेत.


 पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आता पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.


अजित पवार यांनी सांगितले की, शाळा जरी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल.


पालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. एकदा घडी नीट बसली की मग याबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल. दुपारच्या सुट्टीनंतर मुलांनी घरी जाऊन डबा खायचा आहे. तर, नववी इयत्तेपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील.


तसेच पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच केले जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

Thursday, January 27, 2022

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन



पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

लोकमन(प्रतिनिधी):- 


ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं.


पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं.


१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक 'पूर्णिया' हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र :-

डॉ.अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी राहिले. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ.सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. 


हा पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, दिग्दर्शक श्री.नागराज मंजुळे, प्रमोद उदारसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.

पत्रकारिता:- 

डॉ.अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ.अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केल.



लोकमन महाराष्ट्र न्यज 

 पत्रकार सोहेल मनियार

9284856967

राज्याच्या गृहमंत्र्यांना झाली कोरोनाची लागण



प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती.

कोल्हापूर(प्रतिनिधी): 

राज्याचे गृहराज्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून याबाबत माहिती दिली.


त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.


दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. तर याआधीही अनेक शासकीय बैठका तसेच विविध विकास कामाच्या उद्‌घाटनालाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे साथीच्या आजारातही वाढ होत आहे. 

सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच कोरोना रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967