Friday, March 10, 2023

एसटी बस व दुचाकीचा अपघात- दुचाकी स्वाराचा मृत्यू

 

नगर जामखेड रोड वरील चिचोंडी पाटील येथे अपघातग्रस्त एसटी बस व दुचाकी

चिचोंडी पाटील : (पत्रकार सोहेल मनियार) 

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मेहेकरी नदीवरील, गावाजवळील पुलाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची उमरखेड अहमदनगर बस क्रमांक MH 40 Y 5923 व बुलेट मोटार सायकल (दुचाकी) यांचा अपघात होऊन, दुचाकीस्वार हरीओम दिगंबर घोडके वय 30 राहणार सुलेमान देवळा तालुका आष्टी जिल्हा बीड या तरुणाचा मृत्यू झाला.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस उमरखेड वरून जामखेड आष्टी कडा मार्गे अहमनगरनगर कडे चालली होती. तर बुलेट स्वार तरुण चिचोंडी पाटील कडून नगर जामखेड रोडवरील मेहकरी नदीवरील पूल ओलांडून आठवड गावाच्या दिशेने चालला होता. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळावरून चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी असणाऱ्या 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला असता ड्रायव्हरचा कॉल बिझी येत असल्याचे सांगितले. शेवटी सदर स्थानिक ग्रामस्थांनी चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद भाऊ पवार यांना अपघाताची माहिती फोनवरून दिली. सरपंचांनी फोन करूनही 108 रुग्णवाहिकेचा फोन लागला नाही. शेवटी सरपंच शरद भाऊ पवार व पोलीस पाटील निळकंठ खराडे यांनी 108 रुग्णवाहिकेच्या प्रशासनाला, BVG जिल्हा व्यवस्थापक यांना फोन लावूनही रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. नाविलाज झाल्याने खाजगी ॲम्बुलन्स ने सदर युवकाला नगर येथील रुग्णालयात पाठवले. बराच उशीर झाल्याने तरुणाला वैद्यकीय मदत वेळेवर मिळू शकली नाही. अशी माहिती सरपंच शरद भाऊ पवार यांनी दिली. त्यातच तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेवर व प्रशासनावर नाराजी व संताप व्यक्त केला. सदर अपघात स्थळापासून ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील फक्त एक किलोमीटर म्हणजेच हाकेच्या अंतरावर आहे. अपघात स्थळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख व पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली. पुढील तपास एपीआय शिशिर कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

पत्रकार सोहेल मनियार चिचोंडी पाटील

अन्नातून विषबाधा होऊन दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यु




लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

तालुक्यातील टाकळी काझी येथील एका शेतकरी कुटूंबातील तीघा मुलांना घरच्याच खाण्यातुन विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली असुन यातील दोघा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एकावर नगरच्या खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे.


घरी करुन ठेवलेल्या संत्र्याचा ज्युस किंवा मांसाहारी पदार्थातून ही विषबाधा झाल्याची चर्चा आहे. मयत मुलाचे शवविच्छेदन करण्यात आले असुन त्याचा अहवाल येणे बाकी आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, टाकळी येथे बापू साहेबराव म्हस्के व भाउसाहेब साहेबराव म्हस्के या दोघांचे एकत्रित कुटूंब आहे. यातील बापू हे गवंडी काम करतात तर भाउसाहेब हे चालक म्हणुन काम करतात. त्यांच्या घरातील फ्रिजमध्ये बुधवारी संत्र्याचा ज्युस करुन ठेवलेला होता. हा रस शिवराज बापू म्हस्के व साडेचार वर्षे, स्वराज बापू म्हस्के वय दीड वर्षे, तसेच सार्थक भाउसाहेब म्हस्के वय (१४ वर्षे) यांच्या पिण्यात आला. त्यांनी आदल्या दिवशी मटन खाल्ले असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. नेमकी विषबाधा कशाने याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. गुरुवारी सकाळी या मुलांना त्रास सुरु झाला. त्यांना हॉस्पीटलमध्ये नेत असताना स्वराज म्हस्के याचा रस्त्यातच मृत्यू झाला तर शिवराज म्हस्के याच्यावर उपचार सुरु असताना निधन झाले. सध्या सार्थक म्हस्के याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चांगली असल्याचे समजते. बापू साहेबराव म्हस्के यांना शिवराज आणि स्वराज ही दोनच मुले होती पण या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर 
कोसळला आहे. संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे...