कारगिल विजय दिवसा निमित्त एका सैनिकाच्या जीवनातील प्रसंग व आठवणी.कारगिल युद्धात प्रतिकूल परिस्थितीत शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्याची आठवण कारगिल विजय दिवस रूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. सैन्यदलाप्रति कृतज्ञ भावना उजागर करणाऱ्या कारगिल विजय दिवसानिमित्त एका भारतीय सैनिकाच्या जीवनातील प्रसंगावर,आठवणीवर स्पेशल रिपोर्ट
पत्रकार सोहेल मनियार (अहमदनगर वार्ताहर)
कारगिल विजयी दिवसा निमित्त चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर येथील भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक लक्ष्मण गोपीनाथ हजारे यांनी कारगिल युद्धाच्या सांगितल्या आठवणी आणि जीवनातील प्रसंग त्यांच्याच शब्दात.
कारगिल युद्धात बहादुर शुर पराक्रमी साहसी व भारत मातेच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या आमच्या भावांना भावपूर्ण श्रध्दांजली.
सर्व आजी माजी सैनिकांना कारगिल विजयी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
कारगिल च्या युद्दात प्रत्यक्ष रणभुमी वर दोन - तीन महीने पाकिस्तानी बॉर्डर वर आमच्या वायुदलाच्या रडार यंत्रणे बरोबर डयुटीचा योग आला. सदरच्या वेळेत आलेले काही रोमांचक अनुभव. कारगिल ची प्रत्यक्ष सुरवात होण्यापुर्वी मी माझ्या चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर गांवी सुटटीवर आलेलो होतो. साधारण पणे मे च्या शेवटच्या आठवडयात धोंडयाचा महीना असल्याने मी सुटटीवर आलेलो होतो. मी सुट्टीवर आलो तोच माझ्या आईसाठी दिवाळी - दसरा असायचा. मी सुट्टीवर आलो की माझ्या आईला खूप आनंद व्हायचा. आईने घरी धोंड्याचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.
त्यावेळी आमच्या घरी आमचे जवळचे नातेवाईक मंडळी धोंडयाच्या जेवणासाठी आलेले होते. त्याकाळात फोन सुविधा फारच कमी होत्या. साधारण दुपारी दोन च्या सुमारास पोष्टमन मला शोधत घरी आला व तार देवुन गेला. तारे चा मजकुर होता Leave cancelled. Come soon.(रजा रद्द, कर्तव्यावर लवकर या). तोपर्यंत आमचे जेवण उरकली नव्हती. तार आलेले माहीत झाल्यावर घरातील मंडळी व नातेवाईक थोडेसे अस्वस्थ झाले. जसे - तसे जेवणं झाली. साधारण दोन - तीन दिवसानंतर माझे पुणे - जम्मुतावी झेलम एक्सप्रेसचे रेल्वेचे रिझर्वेशन होते. परंतु अर्जंट ड्युटी वर हजर होण्याचा आदेश आल्याने मी लगेच संध्याकाळी चिचोंडी पाटील वरून साधारणपणे सहा च्या दरम्यान बसने निघालो. सोबत माझी पत्नी शैलजा व १ वर्षाचा मुलगा विशाल देखील होता. मी पत्नीला म्हटल तु आता येथेच थांब पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आमचे एअर फोर्स स्टेशन त्यावेळी peace स्टेशन असल्याने व अगोदर पासुन मी फॅमिली सह सदर ठिकाणी राहत असल्याने पत्नी अगोदर पण सहा महिने बरोबर राहीलेली असल्याने तिने बरोबर येण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी माझ्या आई वडीलांनी, सासु - सासऱ्यांनी व विशेष करून माझ्या प्रिय आजीने तीला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण तिचा निर्णय पक्का होता व तिने मला यायचच आहे अस ठणकाऊन सांगितल्याने माझा नाविलाज झाला व मी लगेच पत्नी व एक वर्षाच्या मुलासह संध्याकाळ च्या झेलम एक्सप्रेसने डयुटीला निघालो. झेलम एकसप्रेस मध्ये अहमदनगरहुन सैन्यासाठी (मिल्ट्रीचा) स्पेशल रेल्वेचाडबा असल्याने व इतर आमच्या जवान मंडळीने फॅमिलीसाठी जागा उपलब्ध करून दिली. असा - तसा ३३ तासाचा रेल्वेचा प्रवास संपला व मी माझ्या एअर फोर्स स्टेशन मध्ये सकाळी पोहचलो. मुलाला व पत्नीला कॉर्टरला सोडून युनिटला पोहचलो तर लगेच समजले की युनिट पाकीस्तानी बॉर्डर वर गेलेले असुन दुपारी एक भारतीय सैन्याची गाडी लोकेशनला जाणार आहे. त्यापधतीने मी माझ्या सामानाची आवरा - आवर केली व आमच्या युनिट च्या गाडीत दुपारी बॉर्डरला निघालो . संध्याकाळी आठ नऊ वाजता साईट वर पोहोचलो. बॉर्डरला जातानाचे रस्त्याचे दृश्य अतिशय विदारक होते. त्याला कारण ही तसेच होते.
आम्ही बॉर्डर कडे आमच्या युनिट च्या गाडीत चाललो होतो व समोरुन बॉर्डर कडुन तेथील रहीवासी त्यांच्या गुरा - डोरासह आमच्या कडे बैल गाड्या , ट्रॅक्टर , ट्रक ने येत होते. तो प्रसंग पाहुन मन अगदी भरुन येत होते. साईट वर पोहचल्या वर मला टेंट मध्ये युनिट प्लॅन प्रमाणे जागा मिळाली. त्यादिवशीची रात्र अशीच गेली. सकाळी - सकाळी च आम्हाला आदेश मिळाला कि रडार अजुन पुढे बॉर्डरला हलवायचे आहे. त्या पध्तीने आमच्या ॲडव्हान्स टिम ने सर्व्हे केला व बाकी सर्वांनी युनिट ची पॅकींग चालु केली. डोंबार्याच्या खेळा प्रमाणे आम्ही सर्व जण आमचे सामान पॅक करत होतो. सहा तासा नंतर आम्ही सर्व पॅकींग करून नवीन लोकेशनला निघालो. ॲडव्हान्स टिम पुढे गेली होती. त्यांनी पुढे जावुन मेस व . सर्वांसाठी टेंट चे नियोजन केले होते. दिवस भर उन्हाचा भरपुर उकाडा होता. साधारण पणे चार वाजता आम्ही सर्व युनिट सह नवीन लोकेशनला पोहचलो. पोहचल्या - पोहचल्या जोराचा पाउस सुरू झाला. सर्व जण कसेबसे वाचले. थोडया वेळाने पाऊस थांबला. सर्वजण आपल्या - आपल्या नियोजीत जागेत स्थिर - स्थावर झाले. टेन्ट (तंबू) मधील मेस मध्ये संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालु होती . वरण, भात,भाजी मोठ -मोठ्या पातेल्यात शिजत होती. चपत्या तयार होत होत्या .
साधारणपणे संध्या काळचे सात - आठ वाजले असतील तेंव्हा अचानक वातावरणात सर्वत्र उडणारे घोडे आणि उडणारे किडे आले. सर्व तयार स्वयंपाकात घोडे आणि किडे पडले. सदरची भाजी, वरण व भातात किडेच किडे व घोडेच -घोडे पडलेले दिसत होते. दिवसभर प्रवास करून सर्व जण दमलेले व भुकीने व्याकुळ झालेले होते. अश्या परीस्थितीत मिळेल ते पोटात पडणे महत्वाचे असल्याने आम्ही सर्वांनी आहे तसे वरण - भात, भाजी ताटात घेतले व दळणातुन खडे निवडावेत तसे ताटातुन कीडे , घोडे निवडुन बाजुला काढून जेवण करत होतो. भुक इतकी प्रचंड लागली होती की काहीतरी पोटात टाकणे हेच महत्वाचे वाटत होते. आमच्यात काही जण शाकाहरी मंडळी पण होती . त्यांना पण नाइलाजास्तव आहे तसे जेवण करावेच लागले. अन्न जगण्यासाठी किती महत्वाचे असते याचा प्रत्यय सदरच्या अनुभवातुन आम्हाला आला . आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. जेवणातुन स्थिर -स्थावर होवुन आप -आपल्या टेंट मध्ये झोपण्या साठी गेलो.
जे जवान ड्युटी वर होते ते ड्युटी वर गेले. साधारण रात्री च्या बारा - एकच्या दरम्यान जोराचा पाऊस व वारा चालु झाला. आमच्या टेंटमध्ये वाऱ्यामुळे पाऊसा चे पाणी येत होते. सर्व टेंट मध्ये कॉट खाली पाणी साचले होते. तेव्हा अचानक जोरात वारे सुटले व सर्व टेंट च्या दोऱ्या साईडने मोकळ्या झाल्या . आमच्या टेंटमध्ये आम्ही सहाजण टेंट चा मधला खांब पकडुन उभे होतो . साईड च्या सर्व दोऱ्या सुटल्या होत्या. पाऊस मी म्हणत होता. पाऊसाने नको नको केले होते. आम्ही सर्वजण साधारण एक फुट पाण्यात उभे राहुन टेंटच्या खांबाला पकडुन उभे होतो. टेंटचे सर्व कापड सर्व बाजुने आमच्या अंगावर आले होते. गार वारे सुटले होते. थंडी पण वाजत होती. आमचे सर्वांचे सर्व सामान,कपडे पाऊसाने भिजले होते. आमचे उददीष्ट फक्त ऐवढेच होते की कोणत्याही परीस्थितीत पावसापासून स्वतः चे संरक्षण करायचे. आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारे येतात. एक - दोन तासा नंतर पाऊस बंद झाला व आम्ही सर्वजण टेंटचा खांब अलगद बाजुला ठेऊन बाहेर आलो. तोपर्यंत सकाळचे चार - पाच वाजले होते. नंतर आम्ही सकाळची वाट पाहु लगलो . सकाळ झाल्यावर साधारणपणे आठ वाजता कडक उन्ह पडले व आम्ही सर्व जणांनी आप-आपले कपडे सुकवायला टाकले. तो दिवस असाच गेला. दुपारनंतर आम्ही आमच्या युनिट ची सेटअप करण्यात गुंतलो. दहा तासानंतर आमचे युनिट पूर्ण क्षमतेने चालु झाले. पुढे कारगिल च्या मुख्य फेजमध्ये आम्ही सर्वजण इतके बिझी झालो की आमचे रडार जास्तीत - जास्त वेळ चालुच असायचे. सदरचा दोन महीन्याचा कालावधी कसा गेला ते समजलेच नाही. हया कालावधीत माझी पत्नी व मुलगा माझ्या पोस्टींग असलेल्या एअरफोर्स स्टेशन च्या कॉर्टर मध्येच राहत होते. कारगिल मध्ये मी सहभागी होतो याचा मला सार्थ अभिमान आहे.
मेजर लक्ष्मण गोपीनाथ हजारे या सैनिकाच्या कार्याला सलाम...
पत्रकार सोहेल मनियार









No comments:
Post a Comment