Monday, August 16, 2021

स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन ठकसेन मेहेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 


ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील येथे ध्वजारोहण करताना स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन ठकसेन मेहेत्रे...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी भारतीय सैन्यदलातील सेवेची उज्ज्वल परंपरा असणार्‍या कॅप्टन ठकसेन नाना मेहेत्रे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कॅप्टन ठकसेन नाना मेहेत्रे यांनी आपल्या २८ वर्षे सैनिकी सेवेत आणि कठीण प्रसंगांचा सामना केला आहे .दि. १ ऑगस्ट १९४५ रोजी अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.पाच भावंडे आणि तीन बहिणी अशा कुटुंबात रोजच्या जगण्याची आंत असताना ते १० ऑगस्ट १९६५ रोजी भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर भरती झाले.

यशस्वी प्रशिक्षणानंतर फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्री मध्ये त्यांनी त्यांचे सैनिक सेवा करत असतानाच ऑनररी कॅप्टन पदापर्यंत विविध परीक्षा व खडतर सैनिकी प्रशिक्षणातून मजल मारली. कॅप्टन मेहेत्रे यांचा बांगलादेश मुक्ती संग्राम मध्ये १९७१ चाली सहभाग होता. नंतरच्या काळात लेह-लडाख या पाकिस्तान सीमेवर दीर्घकाळ ते कार्यरत होते.खालिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात केलेले ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये देखील ते सहभागी होते.

त्याचबरोबर आयोध्या येथील बाबरी मशीद पाडली. तेव्हा देखील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पाठवलेल्या सैन्यामध्ये त्यांचा सहभाग होता. श्रीलंका सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल एलम या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी भारताची मदत घेतली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी श्रीलंकेमध्ये भारतीय शांती सेना पाठवली .या शांती सेनेमध्ये कॅप्टन मेहेत्रे यांनी सलग साडेतीन वर्ष कर्तव्य बजावले. या सर्व गोष्टींचा सन्मान म्हणून ठकसेन नाना मेहेत्रे यांना १५ ऑगस्ट १९९३ साली ऑनररी कॅप्टन हे पद बहाल करण्यात आले.आपली बहुतांश सेवा सीमेवर बजावणारे कॅप्टन ठकसेन नाना मेहेत्रे यांचा यथोचित सन्मान तत्कालीन महामहीम राष्ट्रपती यांनी केला आहे.आपल्या खडतर सैनिकी सेवेनंतर ते ३१ ऑगस्ट १९९३ रोजी सेवानिवृत्त झाले.

ठकसेन नाना मेहेत्रे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत चिचोंडी पाटील येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे,ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.




No comments:

Post a Comment