महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले साहेबांनी लोकाभिमुख कारभार व धडाकेबाज निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडली होती ती आजही कायम आहे !!
लोकमन(प्रतिनिधी):-
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्त्व, अवघ्या १८ महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी आपली छाप पाडली होती. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची सवय असलेल्या अंतुले यांनी पक्षांतर्गत विरोधकांशी दोन हात केले होते. बेधडक आणि तडकाफडकी निर्णय हे त्यांचे वैशिष्टय़ होते.आमदार असताना सरकारच्या विरोधात बोलण्याचे धाडस त्यांनी केले होते. अंतुले यांच्या राजकीय जीवनातील अनेक महत्त्वाचे टप्पे, चढउतार, मुख्यमंत्रीपदी निवड होताना झालेला विरोध, इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या देणग्या, मुख्यमंत्रिपदाचा द्यावा लागलेला राजीनामा या विषयांवर अंतुले यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रास मुलाखत दिली होती. त्यांनी संकलन केलेला गोषवारा.
मुस्लीम आणि भवानी तलवार:-
मुख्यमंत्री असताना लंडनच्या म्युझियममधून भवानी तलवार आणण्याची नुसती घोषणा केली नाही, तर त्यासाठी लंडनवारी केली. तलवार आणि तीही एक मुस्लीम प्रयत्न करतो म्हटल्यावर पक्षातील प्रस्थापितांच्या भुवया साहजिकच उंचावल्या गेल्या होत्या.ब्रिटनच्या राणीची भेट घेण्यासाठी गेलो तेव्हा मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या शिवाजी महाराजांच्या तलवारीसाठी तुम्ही प्रयत्न करता,असे वाक्य एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पुटपुटताच 'शिवाजी महाराज हे कधीही मुस्लिमांच्या विरोधात नव्हते', हे त्याला सुनावले होते. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापाशी शिवाजी महाराजांची तैलचित्र आपल्या काळात बसविण्यात आला.
तडकाफडकी निर्णय:-
कोणताही निर्णय पटकन घ्यायचा यावर भर होता. गरिबांचा फायदा होत असल्यास कोणाचा विरोध आहे याची तमा न बाळगता निर्णय घेतले. याचे एक उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांचे सुमारे ६० कोटींचे कर्ज माफ केले. अकोला जिल्ह्य़ात कर्जबाजारीपणाला कंटाळून एक शेतकरी आत्महत्या करणार असल्याचा अहवाल आपल्याकडे पोलीस ब्रिफिंगमध्ये देण्यात आला. सर्वसामान्यांच्या कल्याणाकरिता सरकार काम करीत असताना एक शेतकरी आत्महत्या करतो हे आपल्या मनाला पटले नाही. तेव्हा विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. प्रश्नोत्तराच्या तासानंतर शून्य प्रहरात शेतकऱ्यांचे कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्यात येत असल्याची घोषणा केली. मंत्रिमंडळाला निर्णय जाहीर केल्यावर त्याची माहिती दिली. गरिबांसाठी काही तरी सरकार करते म्हटल्यावर रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी नाके मुरडली. तेव्हा सरकार हे लोकांसाठी असते हे रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. मुंबईत पोलिसांना अध्र्या चड्डय़ा घालून काम करावे लागे. पोलिसांना त्याचा संकोच वाटे, पण विरोध करणे त्यांना शक्य होत नव्हते. पोलिसांच्या भावना कानावर येताच फूल पॅण्टचा गणवेशात समावेश केला. बेरोजगारांच्या भत्त्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. तेव्हा ६० रुपये भत्ता दिला जात होता. नांदेडला दौऱ्यावर गेले असता एका स्वातंत्र्यसैनिकाची कैफियत ऐकून थक्कच झालेत्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नव्हता. तत्कालीन मुख्य सचिव गवई यांना दूरध्वनी करून मी लातूरला पोहोचेपर्यंत सर्वाना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल हा आदेश काढण्यास सांगितले. पुढील दोन तासांत नवा आदेश निघाला होता. समाजवादी विचारांच्या नेतेमंडळींच्या संस्थेला कोकणात शाळा सुरू करायची होती, पण शासनमान्यता दोन वर्षे रखडली होती.
ही मंडळी मंत्रालयात भेटावयास आली व सारे ऐकून घेतल्यावर एकाने परवानगी मिळाली नाही, तर आंदोलन करायचे का, असा सवाल केला. एक तासात तुम्ही अमक्या अधिकाऱ्याला भेटण्यास सांगितले. तासाने ही मंडळी जेव्हा त्या अधिकाऱ्याला भेटली तेव्हा परवानगीचा आदेशच त्यांना देण्यात आला. हे सारे नेते थक्कच झाले व आभार मानण्याकरिता परत अंतुले कडे गेले. स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके तालुक्यांमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला त्यावरही टीका झाली. जिल्हा विभाजनाची मागणी पुढे येत होती. लातूर, जालना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांच्या निर्मितीचा निर्णय घेतला. आपण प्रतिनिधित्व करीत असलेला श्रीवर्धन मतदारसंघ हा कुलाबा जिल्ह्य़ात मोडत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला याच जिल्ह्य़ातला म्हणूनच कुलाब्याचे रायगड जिल्हा हे नामकरण केले. दक्षिण मुंबईतील गर्दी कमी करण्याकरिता मंत्रालय नवी मुंबईत हलविण्याची आपली योजना होती. अर्थात हा प्रस्ताव अनेकांना पटला नव्हता.
केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव अंतुलेकडे पाठविला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच मुस्लीम जगतात भारताचा प्रभाव पाडण्याकरिता मुस्लीम नेत्याची गरज होती. सिमेंट घोटाळ्यात ज्यांनी अंतुले विरोधात कोर्टात वकिली केली ते राम जेठमलानी हा प्रस्ताव घेऊन आले होते. अंतुले यांनी तेव्हा माजी पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. त्यांनी ही संधी दडवू नको, असे सांगितले होते. आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिल्यावर शेवटच्या काळात पक्ष सोडणे आपल्याला पटले नाही व तो प्रस्ताव फेटाळला.
सिमेंट आणि आयुष्याला कलाटणी:-
राजकारणात अनेक टक्केटोणपे खाल्ले. महत्त्वाची पदे भूषविली. तरुणपणी आंबेत या गावातील रस्ता व्हावा म्हणून बरेच प्रयत्न केले. तेव्हा गावकरी आणि आसपासच्या लोकांकडून देणगी जमवून रस्ता तयार केला. रस्ता व अन्य बांधकामासाठी जमा केलेल्या देणगीतून सिमेंट आणले होते. ते गावातच उघडय़ावर ठेवले होते. सिमेंटची पोती व्यवस्थित राहावीत म्हणून तेव्हा दोन रात्री त्या पोत्यांवर झोपलो.. पुढे हेच सिमेंट आयुष्याला कलाटणी देईल असे तेव्हा वाटले नव्हते. सिमेंट घोटाळ्याच्या आरोपानंतर अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.पुढे १७ वर्षाच्या न्यायालयीन लढाई नंतर अंतुले यांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आज महाराष्ट्रातील अश्या थोर नेत्याचा जन्मदिन त्यानिमित्ताने त्यांच्या महान कार्याला सलाम !!
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment