अहमदनगर-प्रतिनिधी
कोरोनात निधन झालेल्या पत्नीच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाची फाईल मंजूर करण्यासाठी प्राथमिक शिक्षकाला ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असून तिच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे श्रीरामपूर तालुक्यात एका शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.तक्रारदार यांची पत्नी मे व जुन २०२१ मध्ये कोरोनाने आजारी असलेने त्यांना उपचारासाठी नगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. तक्रारदार यांनी पत्नीचे वैद्यकीय उपचाराचे बील स्वतः भरले व त्यानंतर सदरचे बील जिल्हापरिषदेमधून मंजूर होऊन मिळणे करिता सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह श्रीरामपूर पंचायत समिती मार्फत जुलै २०२१ मध्ये प्रस्ताव दाखल केला. सदर बील मंजूर करणे करिता यातील आरोपी चंदा चंद्रकांत ढवळे (वय ४५, वरिष्ठ सहाय्यक,प्राथमिक शिक्षण विभाग, जि.प. अहमदनगर) यांनी तक्रारदार यांचे कडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्या तक्रारीचे अनुषंगाने दि.०७ नोव्हेंबर रोजी जि.प.शिक्षण विभाग येथे पंच, साक्षीदार समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेविका यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून गुरुवारी(दि. १७) आरोपी लोकसेविका यांचेविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाअसून त्यांना ताब्यात घेतले आहे.





No comments:
Post a Comment