Sunday, January 2, 2022

जेव्हा वृध्दाश्रम संपतील तेव्हाच देश सुधरेल - ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल. ; अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

 


चिचोंडी पाटील ता.नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काल्याचे कीर्तन करताना ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल (छाया : सोहेल मनियार)


चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

जेव्हा देशातील वृद्धाश्रम संपतील तेव्हाच देश सुधरेल,लोकांची नीतीमत्ता सुधारेल.ज्या आईवडिलांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळले त्यांना आपण त्यांच्या उतरत्या वयात सांभाळू नये हि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आज लोकांचे राहणीमान बदलले परंतु मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहीरवाल यांनी केले.

सालाबाद प्रमाणे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ह.भ.प.गुरुवर्य मदन महाराज बिहाणी यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ह.भ. प. बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने भक्तांना सप्ताहाचे आयोजन करता आले नव्हते.

 २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये सप्ताहाचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात करण्यात आले होते. त्यामध्ये विदर्भ रत्न रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, गेवराई चे ह. भ.प.अक्रूर महाराज साखरे, वेदांताचार्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे, हिंगणी चे ह. भ.प.सुनील महाराज झांबरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, गाथा मंदिर देहू चे ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले,श्री क्षेत्र आळंदी चे ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे यांनी कीर्तन केले. ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे किर्तन झाले. श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज,श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत मदन महाराज या संतांच्या प्रतिमेचे व पवित्र ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा ग्रंथाची ग्राम प्रदक्षिणा झाली.

सप्ताह मध्ये पहाटे काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन,हरिपाठ,हरी किर्तन,महाप्रसाद,जागर असा दैनंदिन कार्यक्रम होता.सप्ताह काळात सकाळचा नाश्ता, दुपारची पंगत, सायंकाळची पंगत अन्नदाते यांनी दिली. पंगत वाढणे व नियोजन व्यवस्था सर्व तरुण मंडळांनी केली. काल्याचा महाप्रसाद ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या वतीने होता.

चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील भाविकांनी सप्ताहानिमित्त कीर्तनाचा, महाप्रसादाचा लाभ घेतला.


पीठ घेउन जाणे व येताना भाकर घेउन येणे

सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त सहभागी होतात. किर्तनाचा लाभ घेतात. सप्ताह काळात दररोज प्रसादाचे आयोजन केले जाते. यामध्ये आचारी सगळाच स्वयंपाक करू शकत नाहीत. म्हणून आम्ही महिला भाविकांना भाकरीसाठी पीठ देतो.आणि त्याच पिठाची भाकर बनवून महिला घेऊन येतात.अश्या प्रकारे उत्तम दर्जाची, दर्जेदार भाकरीचा आस्वाद भाविकांना घेता येतो.सप्ताह यशस्वी करण्यासाठी समस्त सप्ताह कमिटी, ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, सर्व तरुण मंडळांनी सहकार्य केले.- समस्त सप्ताह कमिटी चिचोंडी पाटील.

बातम्या,जाहिरातसाठी संपर्क-

पत्रकार सोहेल मनियार 9284856967



No comments:

Post a Comment