Friday, January 7, 2022

पती व दिराच्या छळास कंटाळून नगर तालुक्यात विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या ; नगर तालुका पोलिस स्टेशनचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी आरोपींना केली तात्काळ अटक

 


 अहमदनगर - (प्रतिनिधी)


जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व दिराकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी (दि.६) पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.

पती शरद गोरख काकडे व दीर रवींद्र गोरख काकडे (दोघे रा. पारगाव वाळुंज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली हरिश्‍चंद्र गुलदगड (वय 39 रा. सिव्हिल हडको, गणेश चौक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत शुभांगी हिचा मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

याबाबत वैशाली गुलदगड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभांगी वाळुंज पारगाव येथे सासरी नांदत असताना पती शरद व दीर रवींद्र हे दोघे तिच्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. जागा घेण्यासाठी व पती शरद याला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरहून पैसे आणावे या कारणासाठी तिचा पती व भायाकडून छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून शुभांगीने गुरूवारी (दि.६) पहाटे राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  शुभांगी हिच्या आत्महत्येची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना कळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. गुरूवारी सकाळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शुभांगीचा पती शरद काकडे व भाया रवींद्र काकडे यांना तत्काळ ताब्यात घेतले.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967



No comments:

Post a Comment