Thursday, February 24, 2022

दोन चंदन तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 19 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

दोन चंदन तस्करांच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.(छाया : सोहेल मनियार)

अहमदनगर :(प्रतिनिधी)


नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील 2 चंदन तस्करांना कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने नगर शहरात पकडले.


या कारवाईत त्यांच्या ताब्यातून 11 लाख 84 हजार रुपये किंमतीचे 370 किलो सुगंधी चंदनाचे लाकडासह सुमारे 18 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


चंदनाचे वृक्ष तोडण्यास बंदी असतानाही नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सुभाष भीमराज दिलवाले (वय 47) आणि राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 30) हे दोन आरोपी इनोव्हा कारमधून नगर शहरमार्गे सुगंधी चंदनाच्या लाकडाची वाहतूक करणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. संपतराव शिंदे यांना मिळाली होती. 


या माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी (दि.24) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकातील पो.ना. योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, सागर पालवे, राजू शेख, अभय कदम, दीपक रोहोकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, बाबासाहेब तागड, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाला सापळा लावण्याचे आदेश दिले.


त्यानुसार पथकाने चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीसकडे जाणार्‍या रोडवर सैनिक लॉनच्या गेटसमोर पहाटे 1 वाजेपासून सापळा लावला होता. पहाटे 3.30 च्या सुमारास चांदणी चौकाकडून 1 इनोव्हा गाडी येताना या पथकाला दिसली. 


सदर गाडी चालकाला थांबविण्यास सांगितले. या गाडीत दिलवाले व सासवडे हे दोघे जण होते. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता प्लॅस्टीकच्या 17 गोण्यांमध्ये अंदाजे 370 किलो वजनाचे चंदनाचे लाकूड आढळून आले. 


या पथकाने चंदनाच्या लाकडासह इनोव्हा गाडी, 1 मोबाईल, 2 हजार 890 रुपयांची रोकड असा 18 लाख 96 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांना अटक केली.


या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. 379, 34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 


पत्रकार सोहेल मनियार

लोकमन महाराष्ट्र न्यूज

9284856967

No comments:

Post a Comment