ऐतिहासिक निकाल! 49 पैकी 38 दोषींना फाशी;11 जणांना जन्मठेप, 13 वर्ष सुरु असलेला खटला अखेर निकाली
लोकमन(प्रतिनिधी):-
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयानं 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयानं 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली असून उर्वरित 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दोषींना शिक्षा ठोठावण्याबरोबरच पीडितांना भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयानं दिले आहेत. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.
13 वर्ष सुरु होती सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. तर 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी 13 वर्षांपासून विशेष न्यायालयात सुरु होती.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात 78आरोपी होते. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. त्यामुळे एकूण 77 आरोपी होते. तब्बल 13 वर्ष चाललेल्या खटल्यात 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी 6 हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते.
अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 6,752 पानांच्या निकालात 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर पुराव्याअभावी 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दहशतवादाच्या आरोपात एकाच वेळी 49 आरोपींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना आयपीसी कलम 302 (हत्या)आणि UAPA अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट :-
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment