गॅसच्या पाईप लाईन मुळे अपघाताची मालिका संपता संपेना नगर दौंड रस्त्याची परिस्थिती; हिवरे झरे येथे तरुण ठार; संदेश कार्ले आक्रमक
अहमदनगर(प्रतिनिधी):-
नगर दौंड रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनला असून येथील अपघाताची मालिका संपता संपेना असे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्यालगतच्या गावातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंपनीला काम करु न देण्याचा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.
नगर दौंड रस्त्या लगत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून नियोजन शून्य काम सुरू असुन रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावणे, मुरूम, माती रस्त्यावर पडल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यालगत सुरू असलेले पाइपलाइनच्या कामामुळे खंडाळा व हिवरे झरे परिसरातील गावामध्ये तर दररोज अपघात घडत आहेत. गेल्या आठ दिवसात याच परिसरात अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आक्रमक झाले असून यापुढे गॅसच्या पाईपलाईनचे काम करु देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या आठवड्यात अपघातामध्ये किरण टेकाडे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. तसेच पेट्रोल पंपासमोर झावरे या वृद्धास गाडीने उडवले. मंगळवार दि. ८ रोजी खंडाळा शिवारात सायंकाळच्या सुमारास एक मुलगा इंडिगो गाडीला धडकला व गंभीर जखमी झाला. त्यानंतर लगेचच हिवरे झरे येथे गॅस पाईप लाईनचे बंद असलेल्या कामामुळे झालेल्या अपघातात सागर मोहारे (वय २७) हा तरुण मृत्युमुखी पडला आहे.
खडकी जवळ खराब झालेल्या रस्त्याचे काम सुरू असल्याने तेथेही दोन गाड्यांचा अपघात झाला पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हिवरे झरे परिसरात काम सुरू झाल्यापासून तीन ते चार अपघात झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. वाढता वेग, बेशिस्त चालक, रस्त्याचे सुरू असलेले काम त्यातच पाईपलाईनचे कामामुळे रस्त्यावर पडलेली माती, मुरूम यामुळे नगर दौंड रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. सर्व अपघातांना हेच कारण असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.सदर रस्त्यावर जेथे काम चालू आहे तेथे अपघात होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. अपघात ग्रस्त ठिकाणी फलक, रिफ्लेक्टर व अपघात टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून काळजी घेणे गरजेचे आहे. नगर दौंड रस्त्यालगत पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी परिसरातील संतप्त ग्रामस्थांसह यापुढे काम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.
संदेश यांची कार्ले यांची सतर्कता:-
नगर दौंड रोड वर जवळपास घडलेल्या प्रत्येक अपघातात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली आहे. अपघातातातील जखमींना रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात कार्ले नेहमीच पुढाकार घेतात. त्यामुळे परिसरात अपघात घडल्यास घटनेची माहिती ग्रामस्थांकडून सर्वप्रथम संदेश कार्ले यांना देण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळते. संदेश कार्ले यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
काम पूर्ण करू देणार नाही:-
गॅसच्या पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामामुळे रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे रस्त्यालगतच्या गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. संबंधित कामाबद्दल प्रशासन व संबंधित ठेकेदार यांना सांगुन देखील उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता परिसरातील ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन गॅसच्या पाईपलाईनचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू देणार नाही,असे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment