Saturday, December 10, 2022



निंबळक प्राथमिक शाळेत आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक संपन्न 


अहमदनगर : जिल्हा परिषद अंतर्गत नगर तालुक्यातील निंबळक प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण - क्रीडा विभाग, मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,पुणे यांच्या निर्देशानुसार शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ( स्कूल सेफ्टी प्रोग्राम )  मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक  प्रशिक्षणार्थी नोडल शिक्षक राजेंद्र निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले .


महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील प्रत्येकी १ अशा ३४ आदर्श शाळांमध्ये ( मॉडेल स्कूल ) आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम मॉकड्रिल चे आयोजन करण्यात आले होते . या मॉकड्रिलसाठी अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव निंबळक या प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली होती . सदर प्रात्यक्षिक मॉकड्रिलचा  एकमेव उद्देश म्हणजे अचानक येणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपासून शालेय विद्यार्थी हा स्वतःचा व इतरांचाही बचाव कसा करू शकेल याबाबतचे वस्तूस्थितीदर्शक प्रात्यक्षिक करून घेणे हा आहे .


या मॉकड्रिलसाठी भूकंप हा विषय घेऊन प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले होते . प्रथम विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून मॉकड्रिल मध्ये सामील झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना धोक्याचा सायरन देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाची सुरुवात झाली . दोन्ही खोल्यांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने डोक्यावर दप्तर घेऊन मैदानावर सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले . मात्र वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची संख्या मोजल्यानंतर काही विद्यार्थी हे कमी आढळले . संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदत बचाव गटाद्वारा सर्व जखमी विद्यार्थ्यांना योग्य शास्त्रीय पद्धतीने मैदानात आणून त्वरित  उपस्थित झालेले आरोग्य विभागाचे डॉक्टर व शिक्षकांच्या मदतीने प्रथमोपचार पेटीच्या सहाय्याने प्रथमोपचार करण्यात आले . तसेच काही गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी तपासणीनंतर सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे  पाठवण्यात आले . अग्निशमन दलाने विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठीची विविध थरारक प्रात्यक्षिके दाखविली . हे सर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमातील सुसज्ज यंत्रणा व उत्कृष्ट सादरीकरण केलेला कार्यक्रम पाहून विद्यार्थ्यांसह उपस्थित ग्रामस्थही आश्चर्यचकित झाले .


या मॉकड्रिलसाठी होमगार्डचे पलटण अधिकारी संजय शिवदे , होमगार्ड तालुका समादेशक माधव हरवणे ,आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष बागले ,डॉ प्रशांत नांगरे ,डॉ दीपिका गाडे ,भाऊसाहेब बनगे सुरेश दळवी ,अग्निशमन कर्मचारी बाळासाहेब घाटविसावे, जिल्हा परिषद निरीक्षक जबीन शेख ,सुचिता टकले यांचेसह पंचायत समिती नगरचे उपसभापती डॉ. दिलीप पवार , सरपंच प्रियांका लामखडे , व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ कोतकर ,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कोतकर ,दत्तू दिवटे , बी डी कोतकर ,प्रभारी मुख्याध्यापक सुखदेव पालवे  नोडल  प्रशिक्षणार्थी शिक्षक राजेंद्र निमसे , शरद जाधव ,दत्तात्रय जाधव , भागचंद सातपुते ,विशाल कुलट ,कल्पना शिंदे , अर्चना जाचक ,अलका कांडेकर , सुनिता रणदिवे , सुजाता किंबहुने , प्रज्ञा हापसे ,शैला सरोदे आदी उपस्थित होते . हा शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिल चे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सादरीकरण केल्याबद्दल जि प चे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , नगरचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव , हिंगणगाव केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी यांनी निंबळक शाळेचे अभिनंदन केले आहे .


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी नोडल शिक्षक राजेंद्र निमसे यांनी केले . उत्कृष्ट असे सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव तर आभार भागचंद सातपुते यांनी मानले .

 

No comments:

Post a Comment