मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची कंपन्यांसोबत चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
सध्या खरिपाच्या काळात जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई सुरू आहे.त्यामुळे ऐन खरिपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणून जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी खत कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर येत्या आठ दिवसात जिल्ह्यात साडेसात हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली.त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खताचा प्रश्न सुटणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
खरीप हंगामातील कपाशी,बाजरी, मका, सोयाबीन, ऊस व इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे म्हणून मंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला. नेवासा तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतांमधून ६९१ मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक केलेला आहे. त्यातील ७० टक्के म्हणजेच ४८३.७० मेट्रिक टन युरिया परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली.नेवासा तालुकासाठी ४८३.७० मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. युरिया खताची मोठी टंचाई असताना मुळा बाजार मार्फत सोनई व नेवासा येथून १३० मेट्रिक टन युरिया खताची ९३९ शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. मुळा बाजार तर्फे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया खत मिळावे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यास तीन गोण्या खत आधार कार्ड लिंक करून प्रति गोणी २६६ रुपये दराप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment