Tuesday, July 20, 2021

धाकटी पंढरी कपारीच्या विठोबाच्या यात्रेवर कोरोनाचे सावट


धाकटी पंढरी,स्वयंभू कपारीचा विठोबा तीर्थक्षेत्र नांदूर येथील मंदिर..(छाया: सोहेल मनियार चिचोंडी पाटील)

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी):अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदूर विठ्ठलाचे येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपारीच्या विठोबाच्या यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने विठ्ठल भाविकांचा हिरमोड झाला.मंदिराला कुलूप असल्याने भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. 

        आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नांदूर येथील कपारीच्या विठोबाची यात्रा सालाबादप्रमाणे दरवर्षी भरते. हजारो भक्तांच्या, दिंड्यांच्या उपस्थितीत,विठ्ठल नामाचा जयघोष करीत, टाळ, मृदुंग,पखवाज यांनी दुमदूमनारे रस्ते,पायवाटा,मंदिर परिसर, हजारो भाविक दिंडीत सहभागी होऊन,विठ्ठलाचा नामघोष करत, पायी चालत येऊन तसेच काही भाविक वाहनाने धाकटी  पंढरीला, स्वयंभू पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने येतात परंतु गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने, त्या अनुषंगाने विठ्ठल मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ नांदूर यांनी विठ्ठल मंदिराला कुलूप लावले आहे. आजच्या आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटता आले नाही, दर्शन घेता आले नाही, पायीवारी करता आली नाही तरी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये हा विठ्ठल पांडुरंग वसलेला आहे.   कोरोना रोगाच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर कुकलारे, पोलीस कॉन्स्टेबल मंजुळे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने विठ्ठल मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट दिसत होता.भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते, मंदिर परिसरावर कोरोनाचे सावट पहावयास मिळाले.

      विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ बलभीम विधाते यांनी सांगितले की आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित यात्रा भरत असते परंतु कोरोना महामारीमुळे व शासनाच्या आदेशामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात आपलं जवळचं कुणी तरी हरवलय अशी दुःखद भावना मनामध्ये येत आहे. या स्वयंभू पांडुरंगाला एकच साकडे आहे लवकरात लवकर या करोना पासून सर्वांना मुक्त कर, या कोरोनातून सर्वांना वाचव.सरपंच आजिनाथ विधाते यांनी सांगितले की,पांडुरंगाच्या दर्शनाला प्रत्यक्ष शरीराने जरी जाता आले नाही तरी मनाने घरूनच पांडुरंगाचे स्मरण करून, दर्शन घेऊन आषाढी वारी करावी, या कोरोनाचा लवकरच नायनाट होवो, पांडुरंगच सर्वांचे रक्षण करणार आहे अशी देवाकडे मागणी केली.


मा.सरपंच तथा विश्वस्त संजय विधाते म्हणाले, कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे भाविकांना घरूनच पांडुरंगाचे दर्शन घेण्याची वेळ आली.दरवर्षी आषाढी एकादशीच्या यात्रेत तीन लाखापर्यंत समाज याठिकाणी जमतो परंतु आज शुकशुकाट आहे याचे दुःख वाटते. विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्तअमृत खिळदकर म्हणाले की घरी राहूनच भगवंत पांडुरंगाचे चिंतन करावे.पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो हे कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो. प्रत्येक भक्ताला तुझ्या चरणाचा स्पर्श मिळो हीच प्रार्थना.

  याप्रसंगी सरपंच आजिनाथ विधाते, ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ विधाते,मा.सरपंच तथा विश्वस्त संजय विधाते,ट्रस्टचे विश्वस्त अमृत खिळकर,प्रा.कारभारी विधाते,पप्पू गवळी,राजू विधाते सर,उद्धव राऊत सर,शिवाजी गायकवाड,कैलास गुरव,विठ्ठल मंदिर ट्रस्ट व सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत नांदूर भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्याबाबत माहिती देत होते.विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.भाविकांचा हिरमोड झाला.





No comments:

Post a Comment